फेसबुक पे चर्चा - केल्याने देशाटन
संकलन - नागोराव सा. येवतीकर
२१ वे शतक प्रचंड स्पर्धेचे युग आहे. अशा या धावपळीच्या युगात जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, यांमध्ये व्यक्तीचा दिवसातील बराचसा वेळ घराबाहेर खर्ची पडत आहे, त्यामूळे कुटुंबीयांना ते जास्तीचा वेळ हल्ली देऊ शकत नाहीत. सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासमवेत राहण्यासाठी खूप कमी वेळ मिळत आहे. काळानूरूप सामाजिक-कौटुंबिक अपेक्षा बदलत जातात. सध्याच्या काळात कुटुंबातील व्यक्तींच्या देखील आपणाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यातील महत्वाची अपेक्षा म्हणजे आपण त्यांना माफक वेळ द्यावा! परंतू जगण्यासाठी चाललेल्या या जीवन संघर्षात आपण त्यांना दररोज जास्तीचा वेळ देऊ शकत नाही परंतू जर करीता आपण वर्षातून एकदा सहलीला गेलो तर नक्कीच आपल्या सर्व कुटुंबीयासोबत आपण मनमूरादपणे राहु शकतो. संघर्षमय जीवनामुळे आपल्या डोक्यावर आलेला मानसिक तणाव कमी होण्यास देखील अशा बाबी हल्ली गरजेच्या आहेत. देवदर्शनास जावे की नको, हा ज्याच्या-त्याच्या श्रध्देचा भाग आहे पण आपल्या व कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सहलीला जरूर जावे. सहलीला जाणे ही जरी थोडी खर्चिक बाब असली तरीही या धावपळीच्या युगात आपल्या कुटूंबात सुसंवाद असण्याकरीता सहलीला जरूर जावं.
- गोविंद भानुदासराव कदम
(राज्यकर निरीक्षक, मुंबई)
वर्षातून एकदा परिवारासह सहलीला किंवा देवदर्शनाला जाणे आवश्यक आहे काय ? होय नक्कीच जावे. रोजच्या धावपळीच्या जीवनात जगत असतांना मुला - मुलींना वर्षभरातील केलेल्या अभ्यासाचा ताणतणाव यामुळे दूर होईल. तसेच त्यांना यामुळे नवचैतन्य निर्माण होईल. गेल्यावर्षी पेक्षाही जास्त मेहनतीने ते अभ्यासाला सुरूवात करतील. तसेच आई आणि वडिलांनाही रोजच्या जीवनातून सहलीला किंवा देवदर्शनासाठी गेल्याने त्यांचाही वर्षभरातील घरगुती तसेच नौकरी, शेती आणि इतर कामाचा थकवा दूर होईल. तसेच आजी - आजोबालाही खुप आनंद होईल. वर्षेभर आई वडीलांना मुला - मुलींच्या शाळेमुळे आणि नौकरी तसेच इतर कामधंद्यामुळे त्यांना सहलीला किंवा देवदर्शनाला जाता येत नाही. म्हणून वर्षातून एकदा तरी मे - जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी सहलीला किंवा देवदर्शनाला वर्षभरातून एकदा तरी नक्कीच गेले पाहिजे. आपल्या कुटुंबातील सर्वांना वेळ दिला पाहिजे.
- राजेश ह. जेटेवाड बरबडेकर
सहल किंवा देशाटन करणे आवश्यक आहे की नाही हे संबंधित व्यक्ती आणि त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. मात्र नियोजन करून केलेला प्रवास मग सहलीचा असो की अन्य कोणताही तो फायदेशीरच ठरतो. कारण यातून आजवर पुस्तकात शिकलेल्या,ऐकलेल्या गोष्टी, स्थळांची माहिती, वेगवेगळ्या भौगोलिक घटनांचा (उदा.भरती-ओहोटी,धबधबा,दऱ्या खोऱ्या,गडकिल्ले)अनुभव याची डोळा याची देही पाहता येतो. असे म्हणतात की "ऐकलेल्या गोष्टी थोड्यावेळ लक्षात राहतात,पाहिलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात आणि प्रत्यक्ष अनुभवाने समजून घेतलेल्या गोष्टी कायम लक्षात राहतात."म्हणूनच जगातील अथांग ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.त्यासाठी घरातून बाहेर पडून फिरणे गरजेचे आहे.
- माधव लिंबाजीराव गव्हाणे
देवदर्शनाला व सहलीला जायला हवं का... होय माझ्या मते वर्षातून एकदा तरी देवदर्शनाला व सहलीला जायला हवं. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही देवदर्शनाच्या निमित्याने का होईना फिरायला निघत असतो. एक वेगळा आत्मिक आनंद मिळतो. वर्षभर केलेल्या कामातून उसंत काढून एका वेगळ्या विश्वात रममान होता येत. कुठलीच काळजी मनाला वाटतं नाही. घरच्या अडीचणीं पासून थोडे दिवस का होईना दूर राहता येत. खरं तर देव हि संकल्पनाच माणसाला ऊर्जा देणारी आहे. देव आणि मानवाचं नातं अदृश्य जरी असलं तरी ते आत्मिक बळ देणारं आहे. त्यामुळे ते सर्वांना हवंहवंस वाटतं. एक श्रद्धा म्हणून आपण कुठे देवदर्शनाला जात असलो तरी त्यामागे एक विश्वासाचं नातं सुद्धा असते. त्यापासून आपल्याला जीवनातील आनंद लुटता येत. जीवनातील चांगले वाईट क्षण आपण अतूट भावनेच्या बळावर एकमेकांशी वाटून घेत येते. मानवी मनाची कास अदृश्यपणे का होईना मनोमन जुळलेली असते.
श्रद्धेनं जीवनात सर्व मिळत असा विचार करणं हा सुद्धा निवळ भ्रम करणे आहे. कर्तृत्वानेच जीवन घडवायचं असतं पण सोबत मात्र विश्वासाची गरज असते. एक अपूर्व विश्वास व आपल्या कार्याची जोड मानवाला यशस्वीत्याच्या मार्गावर नेत असते. बस गरज असते ती श्रद्धेची, विश्वासाची ! तेव्हा सहलीच्या किंवा देवदर्शनाच्या निमित्याने का होईना जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा !
- प्रा. वैशाली देशमुख, नागपूर
हल्ली स्पर्धेच्या धावपळीच्या युगात स्वतःसाठीही काही क्षण मिळणे मुश्किल होत चालले आहे. स्पर्धा नि फक्त स्पर्धा. अश्यावेळी जगण्यातील सर्व रसच निघून गेल्यासारखे वाटते. त्यात कामकाजाच्या सोयीमुळे नव्याने उदयास आलेली विभक्त कुटुंबीपद्धतीमुळे महिनोंमहिने परिवारातील सदस्यांची भेट ही होत नसते. त्यामुळेच निदान वर्षभरातून एकदा तरी परिवारासह सहलीच्या निमित्ताने म्हणा की देवदर्शनाच्या निमित्ताने म्हणा, एकत्र येणे गरजेचे आहे. माणसाला अनंत काळापासून नाविन्याची ओढ आहे, सहलीच्या निमित्ताने खूप नवीन ठिकाणे पाहायला मिळतात, वेगवेगळी संस्कृतीची नव्याने ओळख होते. आणि सहकुटुंब सोबत असल्याने नात्यांतील ओलावाही कायम राहतो. मनालाही आलेली मरगळ दूर होऊन नव्याने येणाऱ्या आव्हानास सामोरं जाण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्यामुळे वर्षातून एकदा परिवारासह सहलीला जाणे क्रमप्राप्त ठरते.
मिलिंद घायवट, कसारा (ठाणे).
वर्षातुन एकदा परिवारासह सहलीला किंवा देवदर्शनाला जाणे योग्य व अावश्यक अाहे.सध्याच युग अत्यंत धावपळीचे युग समजल्या जाते.यामध्ये प्रमुख व्यक्तीला कुटुंबासाठी वेळ द्यायला मिळत नाही. ह्याचच थोडक्यात उदाहरण पहायच झाल तर मुंबईसारख्या शहरांमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींची जवळपास महिनाभर भेट होत नाही. कारण नोकरी, व्यवसायामुळे घराबाहेर जाणारी व्यक्तींचा ड्युटीचा वेळ फारसा अलग असतो. त्यामुळे पती नोकरीहुन परतण्यापूर्वी पत्नी नोकरीसाठी घराबाहेर जाते व मुले शाळेत गेलेली असतात. ते परतण्यापूर्वीच ती व्यक्ती बाहेर जाते. याप्रमाणे जवळपास रविवार सुट्टीशिवाय त्यांची भेट होत नसते. यामुळे त्यांना कुटुंबाला वेळ द्यायला मिळत नाही. मुलेही शाळेव्यतिरीक्त कुठेही जात नसतात.त्यामुळे त्यांचावर केवळ अभ्यासाचच ओझ असते.
परिवारासमवेत सहलीला जाण्यामुळे त्यांच्या मनावरील ताण मोकळा झाल्यासारखा वाटतो. मानसिक व शारिरीक ताण यामुळे नाहीसा होतो. त्याबरोबर घरातील तणाव असो वा मुलांचा डोक्यावरचे ओझे मोकळे झाल्यासारखे वाटते. संपूर्ण परिवार जाण्याने एक वेगळा अानंद त्या परिवारात निर्माण होतो.त्याबरोबरच तेथील पर्यटन क्षेत्राची किंवा देवस्थानाची चांगल्या प्रकारे चर्चा करुन सखोल माहिती सर्वाना मिळते. म्हणुनच वर्षातुन एकदा परिवारासह सहलीला किंवा देवदर्शनाला जाणे योग्य वाटते.
- सचिन तोटावाड धानोरकर
आयुष्य हे अगदी जटिल .त्यातला गुंता काढणं अगदी कठीण .संसाराच्या चक्रात अडकून आपण कायम व्यस्त नी व्यग्र. नोकरी व्यवसाय यात फक्त धावणे. यामुळे कुटुंबासमवेत राहून न राहिल्यासारख आहे. सप्ताह, पंधरवड्यात नको पण वर्षभरात एकदा तरी कुटुंब काफिल्या सोबत फिरायला जाणे गरजेचे ; पण जातांना मोबाईलवर ऑनलाईन राहू नये. घरच्यांसोबत वेळ द्या ,मस्त मज्जा करा. जगातिल सुखदुःखे पाहण्याची डोळस दृष्टी कुटुंबातील मंडळीला द्या. त्यामुळे जगण्याचं बळ येईल, चंगळवाद दूर जाईल. पर्यटन करताना अध्यात्म ,ऐतिहासिक, विज्ञान,पर्यावरण, निसर्ग यांचा समतोल ठेवून सहल करावी. जेणेकरून सगळयांना आनंद मिळेल. पारंपरिक पद्धतीने भोजन मिळाले तर वेगळा आनंद मिळेल. ही ऊर्जा आपणास वर्षभर मिळेल. पर्यटन ते कमी अंतराचे असो वा दूरचे. साधं डोंगर दर्यात फिरलं तरी निसर्ग आपणास भरपूर देतों. हिरव्या कंच जंगलातून ,नदी नाल्यातून फिरताफिरता जीवन जगण्याचं कौशल्य आत्मसात करू शकतो. भटकंती करूया, आनंद घेऊया, अनुभवातून समृद्ध होऊया .
बाप्पा महाजन
वर्षातुन एकदा तरी सहलीला जाणे आवश्यक आहे काय?.....
वर्षातुन एकदाच काय जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा परिवारासह फिरायला जाणं चांगली गोष्ट आहे. सुखी माणसे सहलीला जातात मात्र पण जे पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन भटकतात त्याना परिवारासह सहलीला जाण्याची ईच्छा आहे पण त्याना उदरनिर्वाहासाठी जे सहलीवर जातात त्यांच काय? पोट भरण्यासाठी एवढा वेळ लागतो की, वर्षामागून वर्ष जातात पण त्यांची सोय होत नाही. सहल हे फक्त पांढरपेशा समाजाच आहे पण जे अर्थिक मागासलेले आहेत ,जे अनेक वर्ष गरीबी नावाच्या दलदलीत खितपत पडलेले आहेत त्यांच्यासाठी एखादी सहल निघेल काय ?
- मंगेश हनवटे, नरसीकर
देशाटन किंवा सहल किंवा देवदर्शन जाणे आवश्यक आहे का हा प्रश्न खूप सुंदर आहे, सहल देवदर्शन याला आपण वर्षातून गेलं पाहिजे, काही जणांना पैशाच्या अडचणीमुळे हे शक्य होत नाही पण ज्या ना शक्य होते त्यानी देवदर्शन किंवा सहल याला गेलं पाहिजे याचे कारण माणूस हा सतत काम करत असतो तो कुठलाही असो, त्याच जीवन कस्टमय व संघर्ष आहे, या जीवनातून त्याला थोडा विरंगुळा, मन शांतता लाभावी यासाठी त्यांनी देवदर्शन किंवा सहलीला गेले पाहिजे, यामुळे त्याना वेगळे काही बघायला मिळते व सततच्या जीवनातून थोडा वेगळा श्वास मिळतो, आणि भारतीय संस्कृती खुप पुरातन संस्कृती असून त्या संस्कृतीच्या खुणा आजही ताज्या वाटतात त्या खुणा आज हजारो वर्ष झाले तरी ताज्या दिसतात अशा संस्कृतीच दर्शन घेणे व ती संस्कृती पाहणे, वेगळेच आज एकविसाव्या शतकातील आधुनिक युगात सुध्दा निसर्गाच्या सानिध्यात किंवा निसर्ग सौंदर्य हे माणसांना भुरळ घालते , ते पाहणे हा वेगळाच अनुभव आहे, या भारतातील संस्कृती, भाषा, कला, परंपरा, लोककला याचा अनुभव तेंव्हाच येतो जेव्हा आपण या सर्व गोष्टी पाहू , निसर्ग सौंदर्य हे एवढं आहे कि त्याचा अभ्यास हा प्रत्यक्षात अनुभव घेतला किच होऊ शकतो अश्या कारण साठी सहल आणि अद्यत्मा साठी मूर्ती कला मूर्तीचे वेगवेगळे रूप पाहणे हे त्यातील हावभाव, मुर्ती रूप पाहणे म्हणजे त्याकाळात आपल्याला घेवून जाते त्या साठी सहल व देशाठन केले पाहिजे
रुक्मांगत पाटील
देवदर्शनाच्या बहण्याने का होईना सहलीला नक्की जावे. अस कुठ फिरायला जायच म्हंटल की सगळयांच्या भुवया पहिले वर होतात (खर्च!!) पण देवदर्शन म्हंटल की लगेच तयार होतात. पण त्यात पण विविधता हवी. तरुण मंडळींना डोंगर चढायचा असतो, लहान मुलांना पाण्यात खेळायचे असते, म्हातार्या लोकांना जास्त दगदग नको असते. या सगळयातून सुवर्णमध्य काढणारे ठिकाण शोधने खुप अवघड असते. अस ठिकाण म्हणजे हरिहरेश्वर. सगळयांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होण्याचे ठिकाण.
नंदिनी नितेश राजापुरकर
मनावरचा ताण विसरण्यासाठी हलकं फुलकं होण्यासाठी कधीतरी कुठं सहलीला देवदर्शनाला का होईना जाऊन यावं म्हणजे मन टवटवीत राहातं. पर्यटन केल्याने आपल्याला त्या परिसराची विचार, आचार, आहार तिथली संस्कृती
परिचित होते त्यामुळे संस्कृतीचे आदान प्रदान होण्यासाठी पर्यटन आवश्यक आहे .तेथील भौगोलिक बाबींचा स्वतःला जाणीव होते वेगळ्या अनुभव सतत आपल्या मनात तेवत राहतो
त्या निमित्ताने निसर्ग दर्शनही होते वेगळ्या वातावरणात गेल्यानंतर मन प्रसन्न राहते. म्हणून हलकं हलकं हलकं फुलकं होण्यासाठी कुठेतरी फिरून यावं
- चारू धुमाळ