साहित्य दरबार वैचारिक लेखमाला
पाल्याचे करियर - स्वप्न की स्वप्नाचे ओझे
*मुलांना आळशी बनवू नये*
प्रत्येक पालकाची मनापासून एक इच्छा असते की आपला पाल्य मोठ्या पदावर नोकरी करावे, त्याला निदान पाच आकडी पगार मिळावे अर्थात तो सुखी जीवन जगावे. यासाठी प्रत्येक पालक आपल्या पोटाला चिमटा देऊन लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यास काय हवे, नको ते सर्व हट्ट पूर्ण करतात. हा सर्व अट्टाहास फक्त आणि फक्त मुलांनी यशस्विता मिळविण्यासाठी असते.
मूल जन्माला आल्यापासून पालकांची आपल्या लेकरां विषयी काळजी सुरु होते. आज तर फार मोठ्या प्रमाणावर ही काळजी वाढली आहे असे वाटते. पूर्वी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार तेवढा झाला नव्हता. त्या काळात पालक मंडळी मुलांची अजिबात काळजी करीत नसे. जे शिकायच किंवा जे काही करायचे ते स्व बळावर करायचे. त्यासाठी आई बाबा समोर हात पसरण्याची सोय नव्हती. जवळपास कमवा आणि शिका हे धोरण जरी नसेल तरी कमीत कमी खर्च करायचे, बचत करून शिक्षण पूर्ण करण्याची सवय मुलात होती. त्यामुळे ते शिक्षण घेऊ शकले. घरच्या परिस्थितीची जाणीव त्यांना होती, त्यामुळे घरी पैसे मागताना त्यांना कसे तरी वाटायचे. घरी पैसे मागण्यापेक्षा चार पैसे कुठून मिळविता येईल यांच्या अनुभवी ज्ञानाने ते समृध्द होत गेले. शाळा-कॉलेजमधील सुट्टीच्या काळात आई बाबांच्या कामात मदत करायचे, जमलेच तर मजूरीला जाऊन पैसा एकत्र करायचे, त्यातील लागेल ते तेवढेच पैसे घेऊन बाकी रक्कम आई बाबाला देऊन मुले परत शाळा कॉलेजला जायची. म्हणजे मुलांचे शिक्षण तेंव्हा पालकाना ओझे वाटायचे नाही. उलट त्यांच्या शिक्षणाने पालकाना अभिमान वाटायचे. उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या कमी असल्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्या बरोबर एखादी साधी नोकरी पण लागूंन जायची. जो शिकला त्यास हमखास नोकरी, अशी त्यावेळी स्थिती होती. कारण शिक्षण घेणेच फार कठीण होते. अश्या या कठीण परिस्थितीमध्ये ज्याचे शिक्षण पूर्ण होतसे त्यास चांगली नोकरी मिळून जात असे. आपल्या मुलाने अमके करावे तमके व्हावे असे पालकाना मूळी वाटतच नव्हते. म्हणजे पालक आपल्या मुलांच्या प्रति स्वप्न पाहतच नव्हते त्यामुळे स्वप्न पूर्ण होण्याची काळजी त्यानं वातायची नाही.
या विपरीत आजची परिस्थिती आहे आजचे पालक आणि पाल्य हे दोघेही पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा भिन्न आहेत त्यामुळे आज सर्वत्र चित्र वेगळीच दिसत आहे
यशस्वी मुले हे कोणत्याही पालकाचे खरे बैंक बैलेंस आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यासाठी एक उदाहरण म्हणजे एक पालक ज्याच्या कडे गडगंज संपत्ती होती . पैश्याची काही कमतरता नव्हती. त्यांना एकुलता एक मुलगा होता. अगदी लहानपणापासून लाडात वाढलेला, प्रत्येक गोष्ट हवी तेंव्हा त्याला मिळायची. यात कधी तो हट्टी झाला अन कधी तो वाया गेला हे कळलेच नाही. त्यांच्या कडे खुप संपत्ति असून देखील वाया गेलेल्या मुलास वळणावर आणता आले नाही. याऊलट त्यांच्या शेजारच्या गरीब घरातील मुलगा ज्याचे एक वेळचे खायचे वांदे होते, तो शिकून चांगल्या नोकारीला लागला. त्यामुळे त्यांचे घर चांगल्या स्थितीत दिसत होते तर सुखी समाधानी असलेले घर दुखी दिसत होते. त्याच मुळे मुले जर सुसंस्कारी आणि चांगल्या विचारांची निघाली तर पालक वर्गास कशाचे ही कमी नसते. त्यामुळे प्रत्येक पालकानी आपल्या लेकरांना संस्कारी करणे चांगले असते.पण याचा विचार मात्र कोठे ही होत नाही.
आपली लेकरे शिकून डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर अशा मोठ्या पदावर काम करावे, अशी स्वप्न प्रत्येक पालक पाहत असतो आणि मग त्यासाठी जीवाचे आटापिटा करून त्यांना शिकविले जाते. ज्या वयात मुले खेळावे, नाचावे, बागड़ावे त्या वयात त्यांना प्ले स्कुल मध्ये भरती केल्या जाते. एखाद्या तुरुंगात कोंडल्याप्रमाणे त्या चिमुकल्या मुलांना शाळेत डांबले जाते. येथूनच पाल्याच्या करियर विषयी पालक स्वप्न पाहू लागतो. मुलांची अतिकाळजी आणि अतिसुरक्षा मुलांना कमकुवत बनविते. तेच जर त्यास स्वातंत्र्य मिळाले किंवा त्यांच्यावर बंधने टाकली नाही तर त्यांचा विकास चांगला होतो. मूल समजदार होते. आज मुलांना गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्ले ग्रुप मध्ये प्रवेशासाठी दहा हजार रुपयापासून पालक खर्च करीत आहेत. पालकाना पैश्याची अजिबात तमा नाही. तर त्यांना हवय पाल्याना चांगले शिक्षण. त्यासाठी ते कोणत्याही पातळी वरुन विचार करीत आहेत. इयत्ता आठव्या वर्गापर्यंत मोफत शिक्षण असून देखील आजचा पालक या वर्गापर्यंतच्या शिक्षणा साठी लाखो रुपये खर्च करीत आहे, जे की नक्की अपेक्षित नाही. मात्र पालकाकडे आज पैश्याची कमतरता नाही. वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची पालकाची तयारी आहे. मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्त काहीच करू नये असे आजच्या पालकाची मनःस्थिती आहे. त्यामुळे मुले आळशी बनत चालले आहेत. विद्यार्थी दशेत पालकांचे जे स्वप्न अपूरे राहिलात ते आपल्या मुलांनी पूर्ण करावे अशी विचारधारा करणारी मंडळी समाजात दिसून येतात. आपल्या मुलांचे काय विचार आहेत, त्याची आवड निवड काय आहे हे सर्व बाबी बाजूला सारुन मी म्हणेल ते मुलाने केले पाहिजे असा हट्ट आजच्या पालक वर्गात दिसून येत आहे. त्यासाठी त्यांच्या डोक्यावर पालकांच्या स्वप्नाचे ओझे स्पष्ट दिसत आहेत. त्याचमुळे आज कित्येक मुले उच्च शिक्षण घेऊन सुध्द बेकारीच्या अवस्थेत इकडे तिकडे सैरभैर भटकत असताना दिसत आहेत. पालकांच्या अपेक्षाच्या ओझ्या खाली मुलांना काहीच म्हणता येत नाही. मुलांना काय समजते त्याला कोणत्या विषयाची गोडी आहे आणि कोणता विषय अवघड जात आहे याचा अजिबात विचार न करता त्याची प्रवेश प्रक्रिया पालक आपल्या मनावर पूर्ण केली जाते. मुळात प्राथमिक शिक्षण हे प्रत्येकाच्या शिक्षणाचा पाया असतो. हा पाया अगदी मजबूत आणि चांगल्या प्रकारे बनविण्यात आले तर भविष्यात त्याची काळजी करण्याची गरज नसते. दहावी बारावीला इंग्रजी विषय अवघड जाते म्हणून पहिल्या वर्गापासून इंग्रजीत शिकविण्याचा पालकांचा आग्रह सध्या वाढीस लागला आहे. खरोखरच पहिल्या वर्गापासून इंग्रजी शिकले तरच सर्व कळते अन्यथा कळत नाही असे आहे का ? याचा अजिबात विचार न करता पालक गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक जण आपल्या पाल्याना इंग्लिश कॉन्वेंट स्कुलमध्ये प्रवेशा घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. एक दोन वर्ष तेथील शिक्षण झाले की आपली मराठी शाळा भली रे बाबा म्हणत त्यास दोन तीन वर्षांनी या मराठीच्या शाळेत आणि पुन्हा सेमीच्या शाळेत असे करीत असताना मुलाची अवस्था मात्र धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी होत आहे.
आज कित्येक पालक आपली मराठी शाळा बरी म्हणून इकडे धावत आहेत. या गतिमान स्पर्धेच्या युगात आपला पाल्य कोणत्याही स्पर्धेत उतरला पाहिजे आणि यश मिळविला पाहिजे असे वाटणे साहजिक आहे. मात्र ज्याच्याकडे क्षमता आहे तोच येथे यशस्वी होतो हे ही खरे आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले की पालक नाराज होतात. तुझ्यासाठी एवढं सार केल आणि तू असे मार्क मिळविला असे म्हणत त्यांच्या मनात नाराजी तयार करतात. त्यामुळे मुले जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत. आपल्या मुलांचे करियरची निवड करतांना पालकानी आपल्या स्वप्नाचा बंगला त्यांच्या समोर उभे न करता. मुलांचे स्वप्न काय आहे याचा एक वेळ विचार केल्यास मुले नक्की यशस्वी होतात.
मुलांनी चांगले शिकावे, त्याची प्रगती व्हावी म्हणून जे पालक सर्व सुखसोई मुलांना उपलब्ध करून देतात. त्यांची मुले पालकांचे स्वप्न पूर्ण करताना दिसत नाहीत तर या उलट ज्या मुलांना कोणत्याच सुविधा नाहीत ते मात्र यश मिळवित आहेत. याचाच अर्थ पैश्याने सर्व काही मिळविता येत नाही. त्यासाठी सर्वप्रथम मुलांची तीव्र ईच्छा असणे फार महत्वाचे आहे. बाप कमाई वर मौजमजा करणाऱ्याना रूपयाचे महत्त्व कळतच नाही त्यामुळे आपल्या शिक्षणावर कोण किती खर्च करायला लागलेत हे त्यांना कळत नाही त्यामुळे ते बेफिकिर वृत्तीने जीवन जगतात. जेंव्हा आप कमाई चालू होते त्यावेळी मात्र डोळे उघडतात, परंतु वेळ गेलेली असते. मुळात हाच फरक असल्यामुळे सुविधा नसलेली मुले सुद्धा प्रगती करताना दिसून येतात. जेथे पालक खुपच आशा ठेवून किंवा आपल्या पाल्याकडून अपेक्षा ठेवून राहतो. तिथे यश मिळेलच असे ठळकपणे सांगता येत नाही. त्यामुळे मुलांवर आपल्या अपेक्षाचे ओझे टाकण्यापेक्षा त्यास योग्य वेळी मार्गदर्शन करून त्यास यशस्वी जीवन जगता येईल असे जर केले तर पालक समाधानी होऊ शकतो. मुलांची अधिक घेतलेली काळजी मुलांना आळशी बनविते. ही गोष्ट ही लक्षात घेणे गरजेचे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
*📚साहित्य दरबार वैचारिक लेखमाला*📚
➖➖➖➖➖➖➖➖➖
*पाल्याचे करिअर: स्वप्न की स्वप्नाचे ओझे*
➖➖➖➖➖➖➖➖➖
मुलाचं लग्न झालं की वेध लागतात नातवाचे.आणी ज्यावेळी ही गोड बातमी कळते तेव्हा घरातील प्रत्येकजन वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करु लागतो. कुणी म्हणतो बालाजी तांबेची औषध घ्या. कुणी गर्भसंस्कारचे पुस्तक आणतो . कुणी आनखी काहीतरी. किती हे सोपस्कार! मुल जन्माला येण्याअगोदर पासुन किती जागरुकता? पण हि प्रक्रिया नैसर्गिक आहे . त्याला नैसर्गिकच राहु द्या .
आधुनिक तंत्राने हे सिध्द केलय कि मुल जन्माला येताना तो चिखलाचा गोळा नसतो. ते मुल ऐकते ,पहाते,संवेदनशिलता घेवुन ते जन्माला येते. आता गरज असते वयानुसार त्याला योग्य मार्गदर्शनाची.
आजच्या धकाधकीच्या , धावपळीच्या व विविध प्रदुषणयुक्त वातावरणामध्ये प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या बाबतीत सतर्क आहे . नेमक काय कराव हा गहन प्रश्न पालकांसमोर आहे. प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं .आणी ते पूर्ण करण्यासाठी तो अहोरात्र झटत असतो. मुलगा डॉक्टर,इंजिनिअर, किंवा मोठा अधिकारी व्हावा हि अपेक्षा पालकाची असणं चुक आहे असं मी म्हणनार नाही. अपेक्षा जरुर ठेवा पण , त्या दृष्टीने आपले वर्तन, घरातील वातावरण, असायला हवे. लहान वयातच मुलांचा कल आपल्या लक्षात आला पाहिजे.तो जर अभ्यासात रमत असेल तर मात्र त्याला त्याच्या कलाप्रमाणे घडण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलेच पाहिजे. पण एखादा पाल्य कितीही सांगुन अभ्यासच करत नसेल तर, आपण तेही स्विकारुन त्याची आवड ओळखुन त्याच्या आवडीनुसार त्याला घडवले पाहिजे.सचिन तेंडुलकर अभ्यासात मागे होता पण , त्याने त्याचं करिअर उज्वल केले.व क्रिकेट क्षेत्रात देशाची मान उंचावली.
मुलाने फक्त डॉक्टर,इंजिनिअर किंवा उच्चपदस्थ अधिकारी व्हावे या चाकोरीच्या बाहेर आपण पडत नाहीत. आणि आपली मत बळजबरीने मुलांवर लादल्यामुळे कधी कधी खुप वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते. हे मी या प्रसंगी सांगु इच्छिते.पाल्याचे करिअर घडवतांना पालकांच्या मनात त्यांच्या जीवनातील काही अतृप्त इच्छा असतात व त्या इच्छा आपल्या मुलाच्या माध्यमातुन पुर्ण व्हाव्यात अशी पालकाची भावना असते .आणी माझ्या मते ती चुक नाही.
या प्रसंगाने मी माझी मुलं कशी घडली याबद्दल थोड सांगणार आहे.
याअगोदर संघर्षमय जीवनप्रवास हा लेख मी लिहीला होता.मला दोन मुल एक मुलगी मोठा मुलगा आरोग्य विभागात चांगल्या पदावर आहे.दुसरा मुलगा डॉ प्रदिप MBBS DOMS DNB आहे मुलगी डॉ सौ तृप्ती सांगळे-सानप ही MBBS DGO आहे. आज हि मुले शिकली पण कशी हे मी तुम्हाला सांगणार आहे.
आमचे एकत्र कुटुंब होते . तीन रुमच्या एकाच घरात आठ दहा माणसं व पै पाहुने असायचे.घरात टि व्ही नाही. आणी त्यावेळी मोबाइल तर नव्हतेच.त्यामुळे शिक्षणातील हे दोन दुष्मण माझ्याकडे नव्हते.दुष्मण यासाठी म्हणेल की ,या साधनांचा फायदा जरुर असेल पण कितीतरी पटीने तोटा आहे हे विसरता येणार नाही .मुलं तासनतास टि व्ही समोरुन हालत नाहीत. मोबाइल तर कळायला लागायच्या अगोदर मुलं वापरतात लहाण मुलांचं कौतुक वाटतय पण ते किती घातक आहे.याचा कधी विचार केलाय का?मी तर म्हणेल गरज काय आहे मोबाइलची?खरच मुलांना जर शिकवायचे असेल तर या दोन गोष्टी मुलांपासुन दुर ठेवा.मी कधीही मुलांचे फाजील लाड केले नाहीत . खाने पिणे रहाणे या व्यतिरिक्त बाबीला जास्त महत्व दिले. मी मुलांचे गृहपाठ, वर्गपाठ पाहतांना अगोदर वहीचे मागचे पान पहायची .कारण मुले वर्गात शिक्षक शिकवतांना जर लक्ष देत नसतील तर ती वहीच्या शेवटच्या पाणावर काहीतरी करतात हे माझे पक्के मत झालेलं.म्हणुन हा उपद् व्याप .मुलांनी हेच खावं तेचं खावं असे मी कधीही केले नाहीत .भुक लागली तर चटणी भाकरी पण चवदार असते हे मुलांना बालपनापासुन शिकवल्यामुले आजही माझी मुलं जेवनाच्या बाबतीत कसलीही तक्रार न करता अन्न हे पूर्णब्रम्ह समजतात.लहाण वयात त्यांना आजी आजोबा,काकाकाकु,मामामामी आत्या मावशी यांचे सानिध्य मिळुद्या.आपण काय करतो तीन वर्षाचे मुल झाले की प्ले ग्रुप,नर्सरी,एल केजी,युकेजी माझ्या मते अशा शिक्षणाने आपण मुल नाही एक यंत्र घडवतोय. मुलांना कळायला लागेपर्यंत खरतर मातृभाषेतुनच शिकवावे असं माझ ठाम मत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा खेड्यापाड्यापासुन कहर झालेला आहे .काही ठराविक शाळा असतीलही चांगल्या पण, बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांचा विकास चांगला होइल याची शाश्वती नाही.खरं तर मुलांना बालपण उपभोगु द्यावं लहाण वयातील आपण लादलेली बंधन कधी कधी मुलांना शिक्षणाबद्दलची अनास्था निर्माण करु शकतात. मुलांना भरपूर खेळु द्या,बागडु द्या .कुटुंबाचा सहवास त्याला जास्तीत जास्त मिळायला पाहिजे स्वच्छंदी जीवन जगण्याचा काळ आपण हिरावुन घेतोय का?हा ही विचार कधी कधी मनात डोकावतो. कारण आईवडील दोघेही नोकरीला असतील तर ते मुलं सांभाळायला घरचे कोणी असेल तर ठिक ,नसता त्या बालमनावर काय काय परिणाम होत असतील,? याचाही विचार व्हायलाच पाहिजे.आनखी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मुलांच्या जडन घडणी साठी जसं घरातील वातावरण निकोप असावं तसच बाहेर मुलं कोणासोबत खेळतात ,काय खेळतात हे सुध्दा आपण पाहिले पाहीजे. संगत चांगल्या मुलांचीच असावी . कधीकधी वाईट मुलांच्या संगतीत राहुन मुलं बिघडण्याचा धोका असतो.तसेच मुलांना कधीही हिनवु नका तु मठ्ठ आहेस, तुला काही येत नाही, अशा प्रकारची वाक्ये मुलांचे खच्चीकरण करु शकतात. उलट मुलांना प्रोत्साहन देत राहिले पाहिजे.तु हे करु शकतोस, मला खात्री आहे,अशामुळे मुलांमधील आत्मशक्ती जागृत होवून ती प्रयत्नवादी बनु शकतात. तसेच मुले घडत असतांना मुलगा मुलगी समान माना .एकाच कुटुंबात मुलामुलीमधील भेदभाव मुलांच्या बालमनावर प्रभाव पाडु शकतो. मुलाच्या राहणी मानाकडेही पालकांनी जरासे लक्ष दिलं पाहिजे.साधी सोज्वळ राहणी असावी अशा मताची मी आहे.
मी माझ्या मुलांना घडवतांना ही काळजी घेतली मोठा मुलगा हा अभ्यासात ठिक होता दहावी पर्यंत मराठी शाळेतुनच शिकला.बारावीनंतर वडीलांची खुप इच्छा होती त्यानं डॉक्टर व्हावं म्हणुन, कारण गुणवत्ता असुनही पैशाअभावी त्यांना डॉक्टर होता आले नव्हते .आणी ती खंत त्यांना नेहमी असायची. पण तो कॉम्प्यूटरइंजिनियरला गेला पण तेही शिक्षण त्याला अवघड वाटु लागल्याने आम्ही त्याच्यावर दडपण न देता इंजिनिअरींग सोडुन बीएस्सी ला अडमिशन घेतले.म्हणजे मुलांवर आपली मतं लादु नका .मुल शिकत असतांना मी त्यांना कधी बळजबरीने अभ्यासाला बसवल्याचं मला तरी आठवत नाही.आजच्यासारख्या ट्युशन तेव्हा नसायच्या.आता शाळेत फक्त उपस्थिती साठी जायचे व सगळा अभ्यासक्रम ट्युशन मध्ये शिकुन घ्यायचा ही प्रथाच पडल्यासारखे झालेय की काय असे वाटते.वास्तविक पाहता एखाद्या शाळेत जर त्या विषयाचे पारंगत शिक्षक असतील तर फक्त शाळेत शिक्षकाने चांगले शिकवावे कारण तोच अभ्यासक्रम शाळेत आणी ट्युशन यात शिकवला जातो व त्यात तुलना केली जाते .सध्या या ट्युशनच्या बाजारात पालकाची ससेहोलपट मात्र होतेय.
एका कुटुबात तर मी एक पाटी वाचली *येथे बारावीचा विद्यार्थी आहे ,कामाशिवाय थांबु नये*किती हा अट्टाहास. तेव्हा मुलांना घडवतांना घरातील वातावरणाचा, नैतिक मूल्यांचा,विचार जास्त करावा .मुलांच्या अनावश्यक गरजा जरा जपूनच पुर्ण कराव्यात.असं माझ वैयक्तिक मत आहे. लहानपणापासुनच भरपुर पैसा कमवायचा ,व या पैशासाठीच डॉक्टर ,इंजिनिअर किंवा उच्चपदस्थ व्हायचं हि संकल्पना मनात ठेवुन वाटचाल करु नये .आपण कुणाच्या तरी कामी यावे वआपल्या हातुन थोडीशी का होईना जनसेवा घडावी असा विचार पाल्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना आईबापाच्या कष्टाची जानीव व्हावी. या जाणिवेचे बाळकडु त्यांच्या जीवनात त्यांना कामी येतील. कालच एक बातमी वाचली एका जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या गाडीचे चालक सेवानिवृत झाल्यानंतर त्यांचा सन्मान ज्या पध्दतीने केला ,ते पाहुन खरच मनातील त्यांचा आदर तर वाढला .व दसपटीने त्यांच्यावर संस्कार करणारे त्यांचे आईवडिलांबद्दलचे विचार मनात आले.असे संवेदनशिल अधिकारी जर असतील तर माणसा माणसातील अंतर कमी होईल.
मुलांवर संस्कार करतांना आपणही हेच पहायचे आहे शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्याचे सबलीकरण करायचे आहे. तसेच त्याची आवड लक्षात घेवून त्या क्षेत्रात त्याला पारंगत करण्यासाठी पालक हे दिशादर्शक असावेत. कधीकधी मुलांना अपयशालाही सामोरे जावे लागते अश्या प्रसंगी मात्र पालकाची भुमिका महत्वाची ठरते. कधीकधी मुलांच्या मनावर खुप दडपन असते. बाबांची हि इच्छा आहे ,मला इतके मार्कस् मिळालेच पाहिजेत,मग यातुन जर मुलांना अपयश आलं तर ती कोणतीही टोकाची भुमिका घेवू शकतात.म्हणुन आई म्हणुन मी एक सुचवु शकते ,आईने त्या मुलांची मैत्रिण बनलं पाहिजे. माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेला प्रसंग बारावीची मिरिट असलेली माझी मुलगी CET ला एक मार्कावरुन मेडिकलचा नंबर हुकला.वडिलांची खुप इच्छा डॉक्टरच व्हायचे. अशा परिस्थितीत तिने रिपिट करण्याचं ठरले.परंतु मी तिला नेहमी प्रेरणा तर द्यायची पण हेही सांगायची की ,बाळा तु तर शिकलंच पाहिजे पण टेन्शन नाही घ्यायचे. मी तिचे डी एड ला अॅडमिशन घेतले होते. पण तिची जिद्द कायम, कारण वडिलांची इच्छा पूर्ण करायची होती.म्हणुन मी तिची मैत्रिण होते,बहिण होते ,अशा प्रसंगी खरच आईची भुमिका महत्वाची असते हे लक्षात घेतले पाहिजे.
आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांना वहायला लावू नये.त्यांच्या आवडीचे त्यांना शिकायला मिळावे यासाठी पालकांनी रत्नपारखी व्हावे. मुलांचा कल लवकरच ओळखावा व त्यांना त्या क्षेत्रात प्रेरणा द्यावी. तो शेतकरी झाला तरी चालेल पण सुजान नागरिक झाला पाहिजे .कोणत्याही क्षेत्रात काम केले तरी प्रामाणिकपणे व मेहनतीने काम केले तर काहीही कमी पडत नाही हे त्याच्या मनावर बिंबवले पाहिजे.
मुलांना व्यसनापासुन दुर ठेवावे.त्यासाठी स्वत:निर्व्यसणी असावे .आपला आहार, विहार,राहणी ही आदर्श असावी. मी ठामपणे सांगू इच्छिते ज्या कुटुंबातील बाप शिगारेट ,दारु,तंबाखु, बाहेरचे चमचमित अन्न, यापासुन दुर आहे त्यांची मुलं कधीच बिघडणार नाहित .म्हणुन आदर्श पिढी घडवायची तर खुप जागरुक रहा कारण हवा ,पाणी , अन्न यासोबतच शैक्षणिक प्रदुषण खुप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.या प्रदुषणातुन आपल्या पाल्याला वाचवायलाच हवं🙏🙏🙏🙏🙏*🙏
सौ.खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
मुख्याध्यपिका जि.प.प्रा.शा.
किट्टीआडगांव ता.माजलगांव
जि .बीड समुह क्र.20(मो नं9403593764)
*स्पर्धेसाठी लेख*
*विषय -पाल्यांचे करिअर -स्वप्न की स्वप्नाचे ओझे...*
एकविसाव्या शतकातील आजची ही शिक्षण पद्धती काळानुरूप , गरजेनुसार शिक्षण क्षेत्रात भरपूर प्रमाणात बदल घेऊन आली आहे .
यामध्ये विद्यार्थी विकास , मुल्याची जोपासना, सामाजिक जाणीव , व्यवसायभिमुख शिक्षण वगैरे विविध पैलूचा समावेश करुन एक आदर्श समाज घडावा त्या दृष्टीने विद्यार्थी -शिक्षक आणि पालक असा त्रिशंकू घटक निर्माण केला जेणेकरून शाळेत विद्यार्थी व शिक्षक काय करतात . आजची शिक्षण पद्धत कशी आहे . याची माहिती पालकांना सुद्धा असावी त्या दृष्टीने प्रत्येक शाळा , महाविद्यालयात पालक सभा , पालक समीत्या तयार केल्या गेल्यात. उद्देश एकच आहे विद्यार्थी घडला पाहिजे . मग त्यासाठी कसे व किती प्रयत्न करायचे याचे ठराविक मापदंड नाही . शिक्षण प्रक्रीयेतील महत्वाचा घटक बनल्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती अभ्यासता आली आणि खर्या अर्थाने पालकांची पाल्याविषयीची अपेक्षा वाढली ,आणि ज्या गोष्टीपासून पालक दूरावलेला होता किंवा ज्या गोष्टी पालकांना मिळू शकल्या नाहीत त्या सर्व पाल्यास मिळाव्या म्हणून धडपडतो आणि आपण सांगू तेच व तसेच पाल्यानेही ऐकावे असा आग्रह नकळत घराघरातून होताना दिसतो अर्थात आपल्या अपेक्षांचं ओझं पालक पाल्यावर लादतात असं स्पष्ट शब्दात सांगायला काहीच हरकत नाही . आणि मग त्यापुढे खरी कसरत निर्माण होते या पवित्र नात्यामध्ये त्यामध्ये कधी कधी शिक्षक सुद्धा अपसोकच ओढल्या जातो . याची भरपूर उदाहरणे पहायला मिळतील .
तसं बघायला गेलं तर सक्तीचं , अवाजवी शिक्षण नको अर्थात दहावी पर्यंत शिक्षण सारखेच आहे त्यापुढील शिक्षणासाठी मात्र निवड ठरलेली असते त्यानुसार आपल्या शैक्षणिक कुवतीप्रमाणे करिअर करताना योग्य व झेपेल तेच क्षेत्र विद्यार्थाने निवडायचे आहे त्यामध्ये पालकाने केवळ मदत करायची आहे . एक प्रकारचे सहकार्य करायचे आहे त्यांच्यावर विशिष्ट क्षेत्रात जाण्याची सक्ती करणे टाळले पाहिजे कारण तसे केल्याने काय होईल हे फारसं स्पष्टीकरण देण्याइतका अद्यान पालकवर्ग निश्चितच नाहीये.
एक सुविचारी पालक आपल्या अपेक्षांचं ओझं पाल्यावर कधीच लादत नाही आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये शिक्षणात तरी सक्ती करूच नाही , कारण तसे केल्यास पालक आणि पाल्य यामधील नातं अधिक घट्ट होण्यापेक्षा त्यामध्ये दुरावा निर्माण होतो . लता मंगेशकर यांनी गायनक्षेत्र , सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटक्षेत्र , अमिताभ बच्चन यांनी अभिनयक्षेत्र निवडलं नसतं तर कदाचीत त्यांच्या कार्याची ओळख एक इमेज समाजात पहायला मिळाली नसती . एक स्वची ओळख निर्माण झाली नसती . आज तुम्ही आम्ही जे करतो ते सुद्धा नावासाठीच आणि प्रतीष्ठेसाठीच , पैसा हा गौन आहे ते फक्त एक जगण्यासाठी लागणार्या गोष्टी मिळवून देणारं माध्यम आहे . आजकाल कोणत्याही क्षेत्रात पैसा हा मिळतोच पण त्या क्षेत्रात गेल्यावर अगदी मनापासून काम होतं का ते तपासणं गरजेचे आहे . ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी व्यवसाय करता त्यात तुम्ही समाधानी नसाल तर जीवनाचं गणितच चुकल्या सारखं होऊन जातं . म्हणून करीअर निवडताना सक्ती नकोच .
आजकाल आपण कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करायला जास्त शिकलो कारण हा जमाना शो ऑफ अर्थात प्रदर्शन करायचा आहे . कामापेक्षा पुढे पुढे करणारी माणसे बड्या लोकांना आवडतात अश्या लोकांच्या पंगतीत बसायला निश्चितच कोणालाही आवडणार नाही . आणि अश्या गोष्टी करण्याच्या फंद्यातही पडू नये . कारण पाल्यावर सक्ती केली तर असं करण्याची वेळ त्यांच्यावर न चाहता येऊन लाचारीचे जीवन नकळत प्रदान करू शकते ,तेव्हा तमाम पालकांना सांगायचा उद्देश एकच आहे . मुलांना करिअर निवडताना मार्गदर्शक बना विरोधक नाही त्यामुळे पाल्यासही तुमच्या विषयी विश्वास व स्वतः विषयी अभिमान निर्माण होऊन आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदार्पण केलं . याच्याएवढं समाधान त्यांना कुठेच मिळणार नाही दिवसेंदिवस पाल्य अधिक प्रगती करत त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावत जाईल त्यामध्ये प्रथम त्याचं आणि पर्यायाने पालकाचंही नाव होईल . मला तरी वाटते प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या प्रगती साठी एवढं निश्चितच बलीदान आणि योगदान देईल , यात तिळमात्र शंका नाही .
घनश्याम बोह्राडे
समुह क्रमांक 19
मो 8308432625
*वैचारिक लेखमाला स्पर्धेस*
*पाल्याचे करिअर : स्वप्न की स्वप्नांचे ओझे!*
आजकाल 'पाल्याचे करिअर' हा शब्द जिथे-तिथे परवलीचा बनला आहे.जो-तो आपल्या स्वतःच्या,नि पालक आपल्या पाल्याच्या करिअर चीच चर्चा करताना आढळतात.करिअरची नेमकी व्याख्या काय? याचे उत्तर कोणालाच नेमकेपणाने सांगता येते हे शक्य नाही.केवळ भौतिक सुख-सुविधांची मुबलक प्रमाणात पुर्तता करता यावी यास्तव मोठ्या पगाराची नोकरी अथवा भरपूर अर्थार्जन करता येणारा व्यावसाय करता येणे नि त्यादिशेने वाटचाल करण्यास उपयुक्त मार्गाच्या दिशेने जाणे म्हणजे करिअर! व त्यासाठी शिक्षणात जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी स्व-क्षमतेची,अभिरूचीची किंवा पाल्याच्या क्षमतेची,त्याच्या अभिरुचीची जाणीव न ठेवता वरील मृगजळामागे दिशाहीन धावत राहणे हेच करिअर की काय ही शंका पालक नि पाल्य दोहोंच्या वर्तनातून आज पदोपदी पाहायला मीळते.
खरेतर स्वतःचे करिअर नेमके कोणते नि ते कसे घडवावे याचा नेमकेपणाने विचार करण्याची संधी स्वतः पाल्यास आहे हे चित्र फार दुर्मिळ ठिकाणी पाहायला मिळते.बहुतांश कुटुंबात पाल्याच्या करिअरची दिशा ही पालकच ठरवतात नि त्याच्या पुर्ततेस्तव पाल्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादताना दिसतात.आपणांस जे लाभले नाही ते माझ्या मुलांना मिळाले पाहिजे या पालकाच्या मानसिकतेला बहुतेक करून भौतिक सुखाचीच किनार असते.या खोट्या भ्रमात राहून पालक आपल्या पाल्यास या जिवघेण्या स्पर्धेत ऊर फुटेस्तोवर पळण्यास भाग पाडतो.नि पाल्यही आपल्या पालकाच्या स्वप्नाखातर प्रचंड मानसिक दबावात स्वतःला रेटण्याचा प्रयास करतो. हा त्याचा प्रयास बहुतेकवेळा अपयशी किंवा असमाधानी ठरतो त्यातून त्याच्या स्वतःच्या नि पालकांच्या वाट्याला निराशा येते.या नैराश्यतेतून बाहेर पडणे ज्या मुलांना जमत नाही ती मुले व्यसनाधीन होणे किंवा आत्महत्त्येच्या मार्गाचा स्वीकार करतात की जो पूर्णतः योग्य नाही.
आपल्या पाल्याने त्याच्या आयुष्यात पुढे जाऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे नि त्यासाठी त्याने विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यावा ,12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरींग प्रवेशासाठीच्या प्रवेशपरिक्षेत यश मिळवावेच या हट्टाहसाने पेटलेला पालक आपल्या पाल्याच्या; त्याच्या स्वप्नांचा,विचारांचा,इच्छेचा क्वचितही विचार करताना दिसत नाही.याचे परिणाम व्हायचे तेच होतात. अनिच्छेने आत्मप्रेरणेशिवाय केलेले कोणतेही कार्य कधीच यशस्वी होत नाही . यातून जीवनात तणावाची स्थिती निर्माण होते नि तणावपूर्ण मनस्थितीत विचारांचा लोप होतो.यातून मुले बंडखोर,चिडचिडी,एकलकोंडी,व्यसनी होण्याचा संभव अधिक निर्माण होतो.काही प्रसंगात पालक व पाल्याचे याबाबतीत योग्य समायोजन नाही झाले तर तणावग्रस्त मुले आत्महत्त्या करतात.
आजकाल तर पालक आपल्या पाल्याच्या करिअर ची दिशा त्याच्या जन्मापुर्वीच ठरवत आहे हे खरेच भयाण वास्तव आहे.त्यादिशेने हे पालक त्याची शाळानिश्चीती करणे,ट्यूशन निश्चीती करणे,विविध संस्कारशिबिरांना? त्यास धाडणे,सतत त्याच्या शिक्षणाबाबत जागरूक? रहाणे, हे असले अजब प्रयास करून पाल्याच्या करिअरचे स्वप्न स्वतःच पाहतात की जे स्वतःपाल्याच्या दृष्टिआड असते. नि अशा अदृश्य स्वप्नांमागे धावण्याचा,धावण्यास लावण्याचा अकल्पित प्रकार पालक करतांना दिसतात.जीवनात स्वबळावर,स्वसमजुतीने आचंबित करणारे यश संपादन करून आपले करिअर घडविलेली अनेक यशस्वी माणसांची चरित्रे पाहता त्यांच्या जडण-घडणीत त्यांचे स्वतःचे विचार,प्रयत्न असल्याचे दिसते.या यशस्वी माणसांच्या पालकांनी त्यांच्यावर कोणत्याही स्वतःच्या अपेक्षांचे ओझे,बंधन लादल्याचा कुठेही उल्लेख नाही. तरीही आजचा सुजाण पालक याच्या विपरीत वागताना दिसतो.आजकाल एखादया घरातील पाल्य 10वी किंवा 12 वी स आहे किंवा एखादी प्रवेशपरीक्षा देणार आहे हे त्या घरातील आई-वडिलांच्या तणावग्रस्त चेह-यांना पाहून कोणासही सहज लक्षात येते.आपल्या पाल्यांच्या करिअरची स्वप्ने स्वतः रेखाटून त्यात पाल्यास आपल्याच अपेक्षेचे रंग भरायास सांगणे नि उत्तम कलाकृतीची अपेक्षा करणे योग्य ठरते का? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत पालक मुल घडविणे म्हणजे फुलास त्याच्याप्रमाणे उमलू देणे त्याचा रंग ,रूप ,आकार, गंध त्याला हवा तो धारण करू देणे,त्यावर आपल्या अपेक्षांचे बंधन न लादता आपण केवळ योग्य तितके ,योग्य ते खत-पाणी देणे हे घडत नाही तोपर्यंत अनुत्तरितच असेल.
@ -----स्वलिखित दि.13/11/2016
*श्री.सुनील विलास अस्वले.(समूह क्र.4)*
मु.पो.वडणगे,ता.करवीर, जि.कोल्हापूर
पदवीधर अध्यापक वि.मं.पोहाळे/आळते,
ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर.
मोबा.9049211785
sunilaswale80@gmail.com
suvarnvilas.blogspot.com
पाल्याचे करियर
स्वप्न की स्वप्नाचे ओझे?
पाल्याचे करियर हा सध्याचा प्रत्येक पालकांचा एक ज्वलंत &काळजीची बाब,घटक,विषय ठरला आहे.प्रत्येक आई वडील मूल जन्माला येण्या अगोदरपासूनच भविष्यात त्याने काय केले पाहिजे,कोणत्या क्षेत्रात करियर केले पाहिजे अशी स्वप्ने पाहतात.मूल जन्मल्यापासून सतत त्याचा पाठपुरावा केला जातो.त्या मुलाला मोकळा स्वासच मिळत नाही.सतत त्याच्या कानावर त्याला पावलोपावली तुला मोठ झाल्यावर अमुक करायचे.तमुक करायचे असे त्याला सतत बोलले जाते.
खर तर मूल ही मातीचा गोळा असतात असे म्हटले जाते परंतु ते चुकीचे आहे.लहानशा,इवल्याशा नाजुक जीवाकडे एक महाशक्तिशाली मेंदू असतो,परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते.जन्मापूर्वीच त्या मेंदुमधे दहा ते बारा महापद्म एवढ्या प्रचंड संख्येने पेशींची वाढ झालेली असते.
जन्मलेल्या एक दिवसाच्याही नवजात बालकालाही गंध, वास समजतो.पहिल्या चार दिवसात रंग समजतो.प्रत्येक बालकाकडे उपजत ज्ञान असते हे विसरून चालणार नाही.जन्मताच आईच दूध चोखायला कोण सांगत?ते स्वतः च शिकत असत.रांगण्यापासून उठण्यापर्यन्त सर्व क्रिया कोण करत?ते स्वतः च पडत झडत करत असत.मग तो मातीचा गोळा कसा असू शकतो?
या विषयासंधर्भात
प्रा.ग.प्र.प्रधान म्हणतात,'मुले ही मातीचे गोळे असतात&त्यांना थोपटून घड़वायच असत,ही कल्पना चुकीची आहे,मूल तर फूल असतात त्यांना त्यांच्या आंतरिक उर्मिन फुलू द्यायच असत'.
प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायलाच हव.तोही निर्णय घेऊ शकतात ही मानसिकता आंगी बानायला हवी.फक्त त्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे पाहून योग्य तेथे मार्गदर्शन करावे.आपण पाहिलेले स्वप्नच ,आपण ठरवलेल्या गोष्टीतच मुलांनी करियर करावे ही जबरदस्ती,अट्टहास कशासाठी?त्यालाही स्वातंत्र्य आहे,बुद्धिमत्ता आहे,पालकांनी फक्त आपला पाल्य योग्य मार्गाने जातो आहे की नाही पहावे .मग पालकांनाही & पाल्यानाही दोघांनाही एक खरोखर सत्यात उतरणारे स्वप्न वाटेल ,त्याचे ओझे वाटणार नाही.
प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना स्वावलंबी बनवल पाहिजे.स्वतः ची कामे स्वतः करणे,स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याची सवय लावली पाहिजे.म्हणतात ना,'आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'.मोठेपणी कर्तुत्ववान बनविन्यासाठी कार्यक्षमतेचे धड़े लाहानपनापासूनच द्यायला हवेत.वेळ श्रम &पैसा या गोष्टीचे संयोजन करणे हे लाहानपनापासूनच घरातील छोटया छोट्या व्यवहारातून शिकवायला हवे.छोट्या वस्तु ,गोष्टी निवडीचे स्वातंत्र द्यावे,म्हणजे भविष्यात मोठे मोठे योग्य निर्णय घेऊ शकेल.
कधी कधी आपण म्हणतो,रम्य ते बालपण',किंवा'लाहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा'.कारण बालपण म्हणजे खेळण्याचे बागडण्याचे वय.पण सध्याच्या काळात ही सर्व गैरसमजूत वाटते.कारण अनेकदा मुलांना कसलेच अधिकार दिले जात नाहीत.म्हणून मुलांचे बालपण रम्य करायचे असेल तर त्यांना स्वतः च्या आयुष्याबाबत थोडासा अधिकार,निवड करण्याची संधी द्यायला हवी.मुलांना काय कळतय?त्यांचे निर्णय बरोबर कसे असतील?त्यांना सारासार विचार करण्याची,चांगली वाईट कळण्याची बुद्धि कुठे असते.असे पालकांना वाटते.लहानपनापासूनच मुलांना छो टया छोट्या गोष्टी निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
उदा:
*चार पाच शर्ट मधून एखादा शर्ट निवडण्यास सांगणे,
*कोणते फळ आवडते ते विचारणे,
*कोणती भाजी आवडते,अशा प्रकारे सवय लावावी.
पालकांनी मुलांच्या भविष्याबद्दल
अवाजवी चिंता करणे सोडले पाहिजे.आजच्या कृतिचा आनंद घ्यायला हवा.मुलांना सुसंस्कारित घाडवन्याचा प्रयत्न केला पाहिजे.मुलांनी डॉक्टर,इंजिनियर झालेच पाहिजे.असे पालकांना वाटते.पण या झालेच मधला च खुप घातक ठरतो.त्यामुळे मुलांच्या मनावर ताण येतो,हसत खेळत राहणार आपल् फुलासम मूल कोमेजुन जाते.म्हणूनच मुलांना त्यांच्या कलेकलेन घडू द्यायला हव.पाकळी पाकळी ने फुलू द्यायला हव.अतिअपेक्षा ,अवाजवी ध्येय ,जोर-जबरदस्ती,मानसिक ताण हा स्वतः वर व् मुलांवरही येऊ नये याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.
ज्याप्रमाणे जीजाऊ मासाहेबांनी शिवाजी घडवण्यासाठी त्याला शुर विरांच्या, भीम ,कृष्णाच्या गोष्टी सांगीतल्या तसे पोषक वातावरण निर्मान केले.त्याच प्रमाणे पालकांची भूमिका आता' कुंभाराची' नाही.माळ्याची आहे.उत्तम विचारांच माती,खत,पाणी घालायच ,मशागत करायची पण नंतर मात्र फुलरूपी मुलांना आपली आपण उमलु द्यायच.
पालक आणि पाल्य यांच्यात वाद न घडता संवाद घडला,ते जर एकमेकांचे मित्र बनून राहिले तर मुलांचे करियर हे ओझे न वाटता ते एक पालक व् पाल्य दोघांसाठी सत्यात उतरणार सुंदर असे स्वप्न बनेल.
मीनाक्षी माळकर
68
🎯 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला.....
🎯विषय : पाल्यांचे करिअर- स्वप्न की स्वप्नाचे ओझे.....
आजच्या स्पर्धेच्या युगात सर्व पालक आपल्या पाल्यांच्या बाबतीत फारच जागरूक आहेत ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि का असू नये असायलाच हवे कारण या आधुनिक काळात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेलतर स्वतःला सिद्ध करण्याची धमक मुलांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.त्यांचे करिअर उत्तम घडवायचे असेलतर पालकांनी त्या दिशेने सुरवात करत असताना प्रथम आपल्या पाल्यांचे अगदी बारकाईने निरिक्षण करावे कि त्याची रुची कशात आहे कारण हे अत्यंत आवश्यक अशी बाब आहे मुलांची रुची आवड ज्या विषयात ज्या गोष्टीत आहे त्यातच त्याला करिअर करण्यास प्रोत्साहन द्यावे आपण आपले मत किंवा आपली आवड त्यांच्यावर लादू नये यामुळे विपरित परिणाम होऊ शकतात प्रत्येकच पालकांना वाटते की माझा पाल्य डॉकटर,इंजिनियर,यासरख्याच उंच्च पदावर कार्यरत व्हावा, पण विचार करावा लागेल की जरी निसर्गाने बुद्धी सर्वांना सारखी दिली असलीतरी विचार करण्याची क्षमता आवड निवड या बाबी सर्वांच्याच सारख्या असूच शकत नाहीत म्हणून मुलांची आवड त्यांचा कल लक्षात घेणे गरजेचे आहे. आता याचेही कष्ट पालकांना जास्त घेण्याची गरज नाही आजच्या युगाला आपण आधुनिक युग म्हणतो या युगात विज्ञानाने ऐवडी प्रगती केली आहे की मुलांचा बुध्यांक आपण तपासून पाहू शकतो व त्या नुसार त्यांना त्यांच्या आवडत्या विषयात करिअर करण्यास प्रोत्साहन देऊ शकतो त्यातच। मुलांचे खरे भवितव्य घडू शकते कारण प्रत्येक व्यक्तीत काही सुप्त गुण असतात आणि त्यांना त्यात प्रेरणा मिळालीतर ते खूप उत्तम प्रकारे त्यांच्या कलागुणांना जोपासून त्यांचे भविष्य उज्जवल करू शकतात तेव्हा गरज असते ती फक्त त्या गुणांना ओळखण्याची त्यांच्या आगळ्या वेगळ्या सृजनात्मक कौशल्याला प्रेरणा देण्याची या मुळे मुले कसल्याही दबावाखाली किंवा तणावाखाली राहणार नाहित आपण पाहतो सध्याच्या परिस्थितीत जेव्हा दहावी बारावीचा निकाल लागतो त्यावेळी अनेक मुले वेग वेगळ्या तणावात असतात कारण त्यांच्या निकालाचे अंदाज अगोदरच त्यांच्या पालकांनी बांधलेले असतात काहींनीतर पुढे कुठे कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे हे सुद्धा ठरवून ठेवलेले असते या वाढत्या अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेलीली कित्येक निरागस मुले मुली नको त्या वयात अतिशय टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवतात अशा भयानक प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ कोणालाच येऊ नये .
आपण पाहतो मुळातच काही पालकांनातर त्यांचा मूळ हेतूच माहित नसतो इतरांच्या मुलांनी जे केले तेच आपल्याही मुलाने करावे ही अपेक्षा करने चुकीचे आहे प्रत्येकाची चिकित्सकवृत्ती ,सृजनशीलता हि पूर्णपणे वेगळी असते आणि या वेगळ्या विचार करण्याचा पद्धतीनेच अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले.मानासशात्रीय दृष्ट्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी दिर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून एखादी गोष्ट मुलांना समजवताना त्यांना स्वतःला काही अनुभव येऊ द्यावेत या मुळे त्यांच्यात स्वअध्ययनाची गोडी निर्माण होईल आणि आवड असेलतर मुले पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीकडे आकर्षित होताना दिसतात उदा: काही मुलांना चित्रकलेत आवड असते ती मुले पुन्हा पुन्हा रंग ,चित्र, किंवा निरीक्षण याच गोष्टीकडे आकर्षित होतात,आणि शास्त्रीय दृष्ट्या हे खरे आहे की ज्या मुलांमध्ये निरिक्षण शक्ती जास्त असते ते कला शास्त्रात प्रगती करतात म्हणून अपल्याला काय हवं आहे किंवा आपल्याला जे आवडते तेच मुलांनी करावे हा हट्ट प्रथम पालकांनी सोडायलाच हवा आणि असे केलेतरच आपण आपल्या पाल्यांचे खरे मार्गदर्शक ठरू शकतो कारण जशी मुले आपल्या समोर लहानाची मोठी होतात तशातच त्यांच्यात अनेक अवस्थाही येत असतात जसे ,बाल्य अवस्था,किशोर अवस्था,या अवस्थेत मुलांमध्ये झपाट्याने बदल होतात तसेच त्यांच्या मानसिक क्षमतेतही बदल होत असतात अशात अनेक वेळा मुलांमध्ये काही न्यूनगंड निर्माण होतात व ते आपल्या पालकांपासून दुरावत जातात आणि पालकांचे सांगणे शिकवणे त्यांना पटत नाही त्यापेक्षा आपण त्यांच्या वयाचा विचार करून प्रथम त्यांचा मित्र ,मैत्रीण बण्याचा प्रयत्न करावा जेणे करून मुले त्यांच्या सर्व समस्या आपल्याला निसंकोचपणे सांगतील व त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेणे सोईचे ठरेल म्हणून प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य हे आहे की आपण आपल्या पल्याची बोद्धीक क्षमता सर्वप्रथम पडताळून मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन द्यावे,त्याच्यावर आपली आवड लादन्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यास
त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करावा......
मुलांना कमवून ठेवण्यापेक्षा त्त्यांनाच कमवण्यालायक बनवू आपल्या पाल्यांचे करिअर त्यांच्या आवडीनुसार घडवण्यास त्यांना प्रेरित करू......
✍जोगदंड जयश्री
62......
विषय -पाल्यांचे करिअर -स्वप्न की स्वप्नाचे ओझे...
आपण सारे स्वप्नांवर जगत असतो . आपला इतिहास कितीही कठीण प्रसंगातून मार्गक्रमण करत आलेला असला तरी आणि वर्तमान कितीही आक्रमक असला तरी आपण आपल्या मनाला सतत बजावत असतो हेही दिवस जातील . भोग सरल सुख येईल असं आपण म्हणत दिवस सारत असतो .आपली अर्धवट राहिलेली स्वप्न आपल्या मुलाबाळांनी पूर्ण करावीत म्हणून प्रयत्न करत असतो . त्यांच्या भविष्यात आपलं सुख शोधत असतो आणि हे काही चुकीच किंवा अशक्यप्राय असं नाही .मुलांच्या मनात स्वप्न पेरावीत , त्या स्वप्नप्राप्तीसाठी त्यांना प्रयत्न करायला प्रोत्साहन द्यावे . मुलांच्या व आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद मिळवावा .
पण सध्य परिस्थिती पाहता मन सुन्न व्हायची वेळ आली आहे .मूल दोन अडीच वर्षाचे झाले की लगेच त्याची रवानगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होत आहे .शाळेतून घरी आल्यावर लगेच ट्युशनसाठी म्हणून पाठवले जात आहे . आपण शाळेच्या , शिक्षणाच्या नावाखाली मुलांचे बालपण हिरावून घेत आहोत हे कसं आपल्याला कळत नाही याचे नवल वाटते आहे . दोन अडीच वर्षे वय असणाऱ्या चिमुकल्या जीवांना स्पर्धेच्या गोंडस नावाखाली वेठीस धरतो आहोत . होमवर्क म्हणून रात्री उशिरापर्यंत त्यांना जागवलं जातं .शेजारच्या किंवा आप्तस्वकीयांच्या मुलांशी तुलना केली जाते .पण मुलांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही .
मुलं मोठी होऊन शाळेत जाऊ लागली की तर ही स्पर्धा जीवघेणी ठरावी एवढया क्रूरपणे राबवली जाते . मुलांना सतत अभ्यासावरून बोललं जातं . मी एवढे कष्ट करून तुला शिकवतो आहे त्याच चीज कर .शेजारच्या काकांचा मुलगा डॉक्टर होतोय तू निदान इंजिनिअर तरी हो असं त्याला सारखं सांगितलं जातं पण त्याची अभिरुची कशात आहे हे लक्षात घेतलं जात नाही . त्यालाही काही स्वप्न असू शकतात याचा विचार केला जात नाही . 'शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास' ही संकल्पना असतानाही पालक सर्वांगीण विकास करण्याऐवजी त्याला पंगू करू पाहताहेत असं वाटत . स्वप्न पाहणं चुकीच नाही पण अवास्तव स्वप्न पाहून मुलांना दडपण देऊन त्यांच्या स्वातंत्र्याचा गळा दाबू नका .
समाजात वाढती व्यसनाधीनता हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो आहे याचे मुख्य कारण म्हणजे नैराश्य आहे . नैराश्याची कारणे अनेक आहेत . दैनंदिन जीवनातील दगदग , स्पर्धा व जगण्याची धडपड यातून आलेला अपेक्षाभंग सर्वांना दुःखाच्या खाईत लोटतो आहे .तारुणांमध्येही याच समस्येतून व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढते आहे . 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील प्रसंग समाजात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत जो तो धावतो आहे . प्रेशर कुकर मधल्या हवेसारखी मुलं स्वप्नाच्या ओझ्याखाली दाबली जात आहेत .
पालकांना मुलांना लवकरात लवकर कुठेतरी स्थिर करायचे आहे त्यामुळे तेही फक्त त्यांना कामायाब बनवण्याच्या मागे धावत आहेत . काबील बनण्याचे स्वप्न कोणीच पाहत नाही की काय ?असा प्रश्न निर्माण होतो आहे . बरं या सर्व स्पर्धेच्या कोंडीत फक्त मूलच सापडली आहेत असे नाही तर पालकही सापडली आहेत . तेही प्रचंड अस्वस्थता अनुभवत आहेत . काही पालक तर ह्रदयविकाराने त्रस्त झाले आहेत कारण काय तर मुलाचे अपयश सहन करू शकले नाहीत .
ही सगळी जीवघेणी स्पर्धा कशासाठी तर कुणाशी तरी आपली तुलना चालू आहे म्हणूनच ना .पैश्याच्या , प्रतिष्ठेच्या मुखवट्याच्या मागे धावण्यात आपण विसरतो आहोत की 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' असंही काही असतं .आपण सारे निर्मात्याची सुंदर कलाकृती आहोत . आपल्या साऱ्यांना निर्मात्याने वेगळं बनवलं आहे ते या जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून पण आपण मात्र या जीवनाचा आनंद घेण्याऐवजी सतत अवास्तव स्वप्नांच्या मागे धावतो आहोत मुलांना धावायला भाग पाडत आहोत . मुलांच्या सुप्त इच्छा जाणून घ्या .त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा .
मुलांना मोकळा श्वास घेऊ द्या .त्यांना तुमच्या स्वप्नांच्या दडपणाखाली कोंडून ठेऊ नका . त्यांच्याशी संवाद साधत वातावरण प्रसन्न व मोकळे ठेवा .मुलांच्या मनाप्रमाणे लेखक , विचारवंत , समीक्षक , डॉक्टर , इंजिनिअर किंवा खेळाडू जे बनायचे असेल ते बनू द्या . सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांनी तो गायकच बनवा अशी अपेक्षा केली असती तर आज आपल्या देशाला क्रिकेट जगताला एवढा महान खेळाडू भेटला असता का ? अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी अमिताभ खेळाडू बनवा म्हणून ताण दिला असता तर आपण एका सिनेसृष्टीतील ऋषितुल्य महानायकाला पाहिलो असतो का ?
समाजाची रचना सर्व घटकांनी पूर्ण होणारी असते .समाजात डॉक्टर , इंजिनिअर , शिक्षक , प्राध्यापक ,शेतकरी , व व्यापारी हवे असतात तरच समाज संतुलित राहतो अन्यथा असंतुलित समाज निर्माण होईल . 'शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास' ही शिक्षणाची व्याख्या समाजात रुजवली पाहिजे . आपण गुणग्राहक व गुणसंग्राहक बनलं पाहिजे निकोप व सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ."संपत्ती साठी संतती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करू शकणारी चारित्र्यसंपन्न संतती निर्माण करावयास हवी'.मुलांना महापुरुषांची चरित्र वाचायला द्या त्यांचे चरित्र त्यांना प्रेरणा देत राहतील . मुलांना फुलाप्रमाणे फुलू द्या . आपल्या अवास्तव स्वप्नांसाठी मुलाचे आयुष्य कोमेजून टाकण्यापेक्षा जगण्याची मूल्य रुजवणारी स्वप्न मुलांच्या मनात रुजवा. तुमचे , त्यांचे , आपल्या समाजाचे व देशाचे भवितव्य सूर्यप्रकाशासारखे प्रकाशमान होईल यात वाद नाही ...
- ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
मु पो : शिळवणी ता : देगलूर जि : नांदेड
संपर्क :९९२३०४५५५०
स्पर्धेसाठी लेख...
विषय- पाल्याचे करिअर --स्वप्न कि स्वप्नांचे ओझे
सध्या आई -वडिलांच्या स्वप्नांचे व अपेक्षांचे ओझे आपल्या जावळासोबत घेऊनच हसत हसत नव्हे तर स्वप्न व अपेक्षा कशा पूर्ण करू शकणार ? या चिंतेतच बाळ जन्माला येते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . पूर्वी मुला -मुलींची नावे आधी ठरविली जात असत परंतु आता मुलगा किंवा मुलगी डाॅक्टर होणार कि इंजिनिअर हे अगोदर ठरविले जाते आणि हे अपेक्षांचेव स्वप्नांचे ओझे घेऊनच त्याचे बालपण कधी संपते व कधी तो तरूणपणाचा ऊंबरठा ओलांडतो हे त्यालासुद्धा कळत नाही .
हे स्वप्न व अपेक्षा पुर्ण करण्यासाठी त्याच्या जीवाचा आटापिटा सुरु होतो. परंतु त्याच्या आवडीच्या क्षेत्राचा विचार आई -वडिल करायला विसरतात. अपेक्षा व स्वप्न पूर्ण करू न शकल्याने आई-वडिलांप्रमाणे त्या मुलांवरसुद्धा वेगवेगळ्या प्रसंगांना व संकटांना सामोरे जाण्याची वेळ येते .
लता मंगेशकर , अमिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर व असे अनेक महान व्यक्तींवर त्यांच्या आई-वडीलांनी आपले स्वप्न लादले असते तर कदाचित सारे जग एका महान गायिका ,अभिनेता , खेळाडु यांना मुकले असते याचा विचार आई-वडिलांनी आपल्या मुलांबद्दल स्वप्न पाहतांना केला पाहीजे.
सध्या दहावीत घेतली जाणारी कल चाचणी विद्यार्थ्यांचा कल शिक्षकांना व पालकांना कळावा व मुलांनी आपल्या आवडत्या आकाशरूपी क्षेत्रात स्वच्छंदी विहार करून आपल्या सोबतच पालक , शिक्षकांना देशाचा प्रगती , विकासाचा साक्षीदार बनवुन आपल्या वेगळ्या व अनोख्या व्यक्तीमत्त्वाचा ठसा लोकांच्या मनावर कायमचा ठेवु शकतात.
आई-वडिलांनी आपल्या पाल्यावर आपल्या " स्वप्नांचा बाॅम्ब " टाकुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त न करता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर तन-मनाने करू द्यावे तरच संशोधन , प्रगती , विकास होऊन आपल्यासोबत आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊन जगाच्या स्पर्धेत टिकुन राहु शकतात ते सुद्धा अव्वल स्थानी.
नरेंद्र म्हस्के ,शिरपूर ( धुळे ) @ 65
पाल्याचे करिअर : स्वप्न की स्वप्नाचे ओझे
कोवळ्या मनावर ओरखडे ओढणारे निर्दयी पालक
त्या मनाला निर्दयी म्हणण्याचीही उसंत देत नाहीत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे. पण पाळण्याच्या बाहेर पाय ओढायला उतावीळ झालेले पालक आजकाल आपणास दिसतात. जे आपल्या आयुष्यात प्राप्त झाले नाही.आपल्याला जे मिळाले नाही किंवा मिळवता आले नाही ते आपल्या पाल्याद्वारे आपणास मिळावे हा सुप्त स्वार्थ आणि समाजातील प्रतिष्ठा (खोटी) मिळविण्यासाठी आपला पाल्य उच्चशिक्षित चांगल्या नोकरीच्या पदावर असला पाहिजे ही प्रबळ इच्छा बाळगून असणारे पालक मुलांच्या वयाचा वेळेचा किंवा त्याच्या भावनाचा थोडाही विचार करताना दिसत नाहीत. आपण आपल्या भावना त्यावर लादून त्याच्या मानसिकतेत घडवण्याचे की बिघडवण्याचे बीज रोपण करत आहोत हेच मुळी आपणास कळत नाही. मुळात मुलांना शाळेत दाखल करत असताना पासून अप्रत्यक्ष एक एक ओझं आपण त्यावर लादायला चालू करतो. त्याच्या कलागुणाला वाव दिला पाहिजे हे जसे खरे आहे त्यापेक्षा त्या गुणांसाठी त्याला किती राबवायचं हे महत्वाचं आहे. यातूनच करिअरच्या नावाखाली मुलं घाण्याच्या बैलाप्रमाणे राब राब राबवली जातात. टिव्हीवर असणारे रिअॅलीटी शो तर येवढे बोकाळलेत की पालकही आपल्या पाल्यांना अशा शो मध्ये दाखल करुन त्याचे करिअर बनविण्याचा अट्टाहासी प्रयत्न करत असतात. त्याचे वय वा त्याचा अनुभव लक्षात न घेता त्याला अक्षरशः अशा शो मध्ये ढकलले जाते. बाल मानसिकतेचा विचार न करता अवास्तव स्वप्नांचे ओझे करिअरच्या गोंडस नावाने बालकांवर लादले जाते. माहिती आणि तंत्रज्ञान याचा विस्फोट होत असताना ज्ञान घेण्याची प्रखर जिज्ञासा मुलांकडे असताना कांही वेळा केवळ पालकांच्या इच्छेखातर मुलांना स्वतःच्या इच्छेला तिलांजली देऊन अनिच्छेने एखादे क्षेत्र निवडावे लागते. पण अशा वेळी काय घडते किंवा काय बिघडते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.परीक्षा
काळात तर फार नवलाई घडून येत असते. पालक
बेचैन असतात. आणि परीक्षा म्हणजे करिअरची
लक्ष्मण रेखाच समजून पाल्याला ट्रिटमेंट दिली जाते
पालकांच्या धावपळीकडे पाहिले की खरंच फार विचित्र वाटते.अकारण आणि अवास्तव ओझे आपल्या मुलांच्यावर लादुन मोठया न पेलवणा-या स्वप्नात मुलांना ढकलुन दिले जाते.स्पर्धेला जीवघेनं रूप मुलांपेक्षा पालकंच आणतात.परीक्षा जवळ येईल तसं मुलांवर अनेक बंधनं लादली जातात,नव्हे मुलांचे दहावी बारावीचं वर्ष घरातील वातावरण बदलून टाकते.आणि घरातील लोकांच्या सवयी सुद्धा बदलून जातात...मी माझ्या मुलीच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान कधी नियम केले नाहीत किंवा वर्षभर टि.व्ही.बंद ठेवला नाही.फक्त सध्याची सर्वत्र असणारी परिस्थिती आणि त्यात टिकण्याची इच्छाशक्ती याबाबत फक्त जणीव निर्माण करत होतो.त्याचा परिणाम म्हणजे मुलींने दडपण न घेता अभ्यास केला.आणि दहावीत ९१टक्के तीला गुण घेता आले.या उलट मी असेही पालक पाहिलेत कि रात्र रात्र मुलांना जागवून त्याला चहा बनवुन देउन स्वत:ही त्याच्याबरोबर जागत राहुन अभ्यास घेत.परिणामी मुलाच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्या मुलांने ना पालकाचे स्वप्न पूर्ण केले.ना स्वत:चे.तेव्हा मला यवढेच वाटते की पालकांनी अवास्तव आपेक्षांचे ओझे मुलांनवर न लादता व कोणताही जाचक बंधनं न तयार करता केवळ जाणिव जागृतीचे काम करावे.मुले हुशार आहेतच ती त्यांचा मुक्काम नक्की गाठतील. पण स्वप्न पाहण्यात गुंगवणारे आणि स्वप्नांचे ओझे देणारे पालक दिवास्वप्न बघणारा पाल्य आपण घडवत आहोत याबाबत अनभिज्ञअसतात कि जाणीवपूर्वक
तसे वागतात हा संभ्रमाचा प्रश्न आहे. खरे तर करिअरचा विचार करता आपाल्या आयुष्यात आपणास जे क्षेत्र निवडायचे आहे. त्यावर एकाग्र होऊन पाल्यात केवळ जाणीव जागृती केली तर भविष्य आधिक सोयस्कीर होईल. शिक्षण निवडीशी संबंधीत असणारा हा करिअर शब्द जीवनाला स्थैर्य आणि समाधान देणारा आहे. पण याच्या बाजू समजून घेण्याऐवजी करिअरबाबत स्वप्न आणि त्याचं अवास्तव ओझं लादन्याचं कर्तव्य पालकांकडून होत असतं. करिअरची वाटचाल करताना कौशल्याची कसोटी महत्त्वाची असते. प्राप्त परिस्थितीवर स्वार होऊन वाटचाल केली पाहिजे. अपयश हे कदाचीत येऊ शकते पण तो आपला शेवटचा थांबा नाही त्याला तुुडवून पुढं गेलं पाहिजे.आपली कुवत, गुणवता, कौशल्ये, परिस्थिती आदिचा सार्वगिंक विचार करिअर निवडताना व्हावा.
यात पालकापेक्षा पाल्यांचा वाटा व सहभाग महत्वाचा आहे. नसता करिअरच्या वाटेवर स्वप्नाचं ओझं वाहता वाहता जीव मेटाकुटीला यायचा आणि
शेवटी हाती धुपाटणे यायचे.
श्री. हणमंत पडवळ
मु.पो. उपळे(मा.)ता. जि. उस्मानाबाद.
.8698067566.
🌺स्पर्धेसाठी🌺
किती अट्टहास किती तडजोड आपल्या मुलांनी मोठ व्हावं म्हणून.
हीच मनी सदैव आस,त्यांची स्वप्न मुलांनी तरी पूर्ण करावी.जे त्यांना मिळाले नाही ते सर्व मुलांना मिळावे.जे त्यांना करता नाही आले ते मुलांनी करावे. अशी सर्व पालंकाची आपल्या मुलांकडून असते इच्छा छान.
पण या धावपळीचा जगात,स्पर्धेच्या युगात
पालक मुलांना किती तरी क्लासेस लावतात.
त्यांना वेळापत्रक बनवून त्यानुसार वागयला भाग पडतात.काही मुलांची संमतीने ते हे सर्व करतात तर काही जोर जबरदस्तीने .कधी यश तर कधी अपयश पदरी पडते.बिचारे ते तर कधी पालक या नात्यात भरडले जातात, कोण चुक कोण बरोबर सांगणे तसे अवघडच आहे ...
पण कधी चुकून माकून अपयश पदरी पडलेच तर काहीना पचवायला जड जावून ती मुले मृत्युला जवळ करतात.स्वप्नांचे ओझे की स्वप्न पूर्तिचा
आनंद. प्रश्न छोटा आहे.पण खोलवर विचार करणारा आहे कसे वागावे पालकांनी.कसे वागावे मुलांनी.स्वप्न कुणाची .कोणी सांगावे
कोणी काय करावे, ज्याने त्याने आपली जबाबदारी ओळखूनच वागावे...
पालकांनी आपले अनुभव मुलांशी शेयर करून समजून सांगावे, एक मित्र बनून मार्गदशन करावे, ही काळाची गरज आहे...
🌹कविता शिंदे🌹...६७
No comments:
Post a Comment